लेख : संजय पाटील
नाशिक - महात्मा ज्योतिबा फुले विकास मंडळ, नाशिक यांच्या वतीने जनसेवा हिच ईश्वरसेवा या तत्त्वाधारावर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन रविवारी, दिनांक २५ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले होते. गोविंदनगर येथील सागर सांस्कृतिक भवन येथे भरवण्यात आलेल्या या शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन सकाळी १० वाजता आमदार सौ. सिमाताई हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ उद्योगपती श्री. अनिल जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष वसंत खैरनार, उपाध्यक्ष श्यामराव मानक, सचिव श्रीराम जाधव आणि प्रमुख संयोजक राजेंद्र शिरवाडकर यांनी केले होते.
या शिबिरात अनेक युवकांनी, महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिराचे विशेष सहकार्य अर्पण रक्तपेढी, रविवार कारंजा, नाशिक यांनी केले. त्यांच्या वैद्यकीय पथकाने शिबिरादरम्यान संपूर्ण तपासणी व सुरक्षित रक्तसंकलन प्रक्रिया पार पाडली.
शिबिराचा मुख्य उद्देश समाजातील गरजू रुग्णांसाठी रक्ताची उपलब्धता वाढवणे हा होता. महात्मा फुले विकास मंडळाने अशा उपक्रमांद्वारे समाजातील सेवा कार्याची परंपरा जपली आहे. आयोजकांनी नागरिकांना पुढील काळातही अशा उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रक्तदात्यांचे विशेष योगदान लाभले. अशा समाजोपयोगी उपक्रमांमुळे महात्मा फुले यांचा विचार समाजापर्यंत पोहोचवण्यास मदत होत आहे, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.

